रात्र
काळी....
सततच्या शहरी गजबजाटातून,
झगमगाटातून चार निवांत क्षण नेहमीच हवेहवेसे असतात. विशेषतः दिवाळीच्या रोषाणाईच्या आणि फटाक्यांच्या दिवसात तर पुण्यात रहाणं
म्हणजे शिक्षा होऊन जाते. मग पाठपिशव्या खांद्यावर टाकायच्या,
तहानलाडू-भूकलाडू बरोबर घ्यायचे आणि एखाद्या
गडावर नाहीतर निवांत स्थळी दोन दिवस मुक्कामाला जाऊन राहायचं हा आमचा नेहमीचा
परिपाठ. त्यावर्षी हरिश्चंद्रगड ठरवला होता. आम्ही दोघं आणि मुलं. पुण्यातून सकाळी निघून
पांचनईच्या वाटेने दुपारी दोनच्या सुमारास हरिश्चन्द्रगडावर पोचल्यानंतर देवळं,
गुहा वगैरे फ़िरुन गणेशगुहेत विसावलो. त्यावर्षी
पावसाळा अंमळ लांबला होता. ऐन दिवाळीतही पावसाने हजेरी
लावलेली. गडावर मधेच आलेली पावसाची सर, मग खास आमच्यासाठी समोर अवतरलेलं इंद्रधनुष्य, कोकणकड्याचं
विस्मयकारी दर्शन, असं सगळं अनुभवून आम्ही पुन्हा गणेशगुहेत
आलो.
’खूप गर्दी असते गडावर’..
’दिवाळीत तर नुसता बाजार असतो’... ’हल्ली तिथे
खायला जेवायलाही मिळतं’...’सकाळी सकाळी कांदेपोहे मिळतात’..
या आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे अद्याप काहीच घडलं नव्हतं.
आमच्याबरोबर गड चढलेले पाचनईतले तीन गावकरी हरिश्चन्द्रेश्वराची
पूजा करुन परत फिरले होते. त्यांच्यानंतर दोघंजण आले.
आम्हाला वाटलं, ते तरी गडावर रहाणार असतील.
पण साडेपाचच्या सुमारास तेही परत फिरले. शिवरात्र
होती म्हणून ते पूजेसाठी खालच्या गावांमधून आले होते. त्यांनी
सर्वांनीच सांगितलं की गडावर एकट्यानं राहायलाही काहीच भीती नसते. बिनघोर रहा. मुलंही दमली होती, आणि आमच्याबरोबर संध्याकाळच्या जेवणाची सोय होती. अशा
सगळ्या कारणांमुळं आम्ही रात्र गडावरच काढून सकाळी उजाडताच गड उतरायचा असं ठरवलं.
पाऊस पडून गेला होता. अजून आभाळ होतं. त्यामुळं अंधारलेलंच होतं. संध्याकाळ दाटत चालली होती. आपण चौघंच गडावर रहाणार
हे स्वीकारायची माझी अजूनही तयारी होत नव्हती. मला वाटत होतं
की पुण्यामुंबईकडचा एखादा वाट चुकलेला, उशीरा निघालेला गट
अजूनही संध्याकाळी उशीरापर्यंत येईल गडावर मुक्कामाला .. पण
काहीच नाही. गुहेत आधीच अंधार होता. त्यात
आता आजूबाजूचं काही नीट दिसेना. देवळात लावण्यासाठी आम्ही
पणत्या घेऊन गेलो होतो. आम्ही त्या पणत्या लावल्या. त्या उजेडात एक पत्त्यांचा डाव खेळून झाला. मग
शुभंकरोति म्हणून झालं. मग अजून काही स्तोत्रं वगैरे.
आता काय? मुलांना भूक लागली. मग पराठे खाऊन झाले. आम्हीही खाल्लं. संध्याकाळचं जेवणच झालं. मुलं पेंगुळली. पथार्या पसरलेल्याच होत्या, सव्वासात वाजत नाहीत तो
दोघं पांघरुणात गुरगुटून गाढ झोपलीही. काहीबाही बोलत आम्हीही
आडवे झालो. जगदीशला लगेच डुलकीही लागली. माझे डोळे मात्र मिटेनात.
गणेश गुहा छानच होती. एका बाजूला मोठी गणपती बाप्पाची मूर्ती, पंचवीस तीस
माणसं आरामात झोपू शकतील अशी प्रशस्त, स्वच्छ. दोनचार पाकोळ्या सोडल्या तर कुठे किडामुंगीही नाही अशी. पणत्यांच्या मिणमिण उजेडात तिथे छान वाटत होतं. पण
ते वातावरणच असं होतं की मला झोप येईना. दूरवर वीज लवत होती.
गडगडाट ऐकू येत नव्हता, नुसतीच विजेची रेघ
दिसायची. पाऊस पडून गेल्याने गुहेच्या तोंडाशी पागोळ्या गळत
होत्या. गुहेबाहेरच्या झाडांच्या आकृत्या पुसट होतहोत आता
दिसेनाशा झाल्या होत्या. दूरवर एका वस्तीवरचे दिवे लुकलुकत
होते. मुलं झोपेत चुळबुळल्याने जरासाही पांघरुणाचा आवाज झाला,
तरी तो गुहेत घुमत होता. मग मी तो पागोळ्यांचा
आवाज ऐकत बसले. त्याचीही एक गंमत होती. पागोळ्यांच्या एकसुरी टिपिक टिपिक आवाजात मधेच एक वरच्या पट्टीतला टुबुक
टुबुक असा आवाज काही वेळ येई. साताठ वेळा असा आवाज होऊन तो
बंद होई. मग पुन्हा टिपिक टिपिक. मधेच
बाहेरच्या पाण्याच्या कुंडातून आवाज आल्यासारखा वाटला. काय
असेल? दुपारी त्या पाण्यात आम्ही एक पिवळाजर्द पाणसाप पाहिला
होता. तो तर नसेल? मधेच एक वार्याची
लहर.. मग पानांवरून पाणी गळल्याचा आवाज..
घड्याळात
पाहिलं तर अजून आठही वाजले नव्हते. पुन्हा आडवी झाले. डोक्यातली चक्रं काही थांबेनात. गडाचा प्राचीन
इतिहास... चांगदेव, ज्ञानदेवांसारख्यांनी
इथे वास केलेला...कशाकशाच्या साक्षीदार आहेत या गुहा?
ही गणपतीची मूर्ती कोणी घडवली असेल? एक ना दोन.
मधेच वेदू झोपेत चाळवला आणि
मी पुन्हा वर्तमानात आले. गुहेच्या वरच्या डोंगरावर किर्र
जंगल आहे. तिथं कोणती श्वापदं असतील? वाघ,
बिबटे असतील? एखादा डोकावून जात असणार इकडे
अधूनमधून. खरंच एखादा इकडे डोकावला तर? छे! मला जागं राहायला हवं! मी
मोबाईलमधे दोन दोन तासांच्या अंतराने गजर लावून ठेवले. दिवाळीतले
दोनचार भुईनळे ठेवायला हवे होते जवळ. वाघबिघ आला असता तर भुईनळे
लावून पळवून लावलं असतं....!!!! आता मात्र मला एकटीलाच हसू
यायला लागलं. बळेबळे डोळे मिटून डोळेही दुखू लागले. मग पुन्हा उठून बसले. तर अस्पष्ट असा माणसांचा आवाज ऐकायला आला. मी कान टवकारून ऐकू लागले. दोघेतिघे असावेत. पण एवढ्या मिट्ट काळोखात हे आले कुठून? आपल्याला भास
तर होत नाही? गुहेत आमच्या श्वासांचेही आवाज घुमत होते
त्यामुळे ते आवाज बाजूला सारून अगदी कान देऊन ऐकू लागले. खरंच
माणसांचे आवाज होते. हळूहळू जवाळ येत येत आता ते खालच्या,
हाकेच्या अंतरावरल्या हरीश्चंद्रेश्वराच्या देवळातून येत होते.
मला एकदम बरं वाटलं. चला, कोणीतरी आहे सोबतीला. पण पुन्हा वाटलं, खाली देवळात आहेत तेच बरं. त्यांनी गुहेकडे नको
यायला. कोण जाणे कशी आहेत, किती आहेत,
कोण आहेत. मगाशी वाघाची भीती वाटत होती.
आता माणसांचीच वाटू लागली. पण त्यांच्यामुळे
गडावर जाग आली होती. त्यामुळे बरंही वाटत होतं. आता त्यांनी शिवाजीमहाराजांच्या कायकाय घोषणा द्यायला सुरुवात केली.
मधेच फटाकेही वाजवले. एरवी अशा शांत वातावरणात
असल्या आवाजाने माझी चिडचिडच झाली असती पण तेव्हा मला ते घोषणांचे, फटाक्यांचे आवाजही हवेसे वाटले! मला आपली लखलख
चंदेरी तेजाची दुनिया आठवली. प्रकाशाचं जग, आवाजांचं जग, माणसांचं, चेहर्यांचं,
यंत्रांचं, वहानांचं..!
त्याच जगाला कंटाळून आपण
दिवाळीत असे वनवासी होतो. मग तेव्हा हवीहवीशी वाटणारी शांतता,
एकटेपणा, निसर्गाची संगत सगळं मिळालेलं असताना
पुन्हा त्या जगासाठी हुरहूर?
मधेच त्या माणसांचं जोरजोरात हसणं ऐकू आलं. मग मी
जगदीशला हलवून उठवलं. त्याला म्हणलं, ऐक,
कोणीतरी माणसं आली आहेत गडावर. तोही ऐकू लागला.
मी म्हणाले, बघूया का पुढे जाऊन कोण आहेत ते?
तो म्हणाला, ’माणसं आहेत एवढं पुरेसं आहे.
झोप तू!’ ’किती वाजले?’
मी
सांगितलं, ’नऊ!’ आम्हाला दोघांनाही हसायला आलं. तो परत झोपून गेला. मी जागीच.
मग मी झोप यावी म्हणून
रामरक्षा म्हणू लागले. मधेत ती तार कुठेतरी तुटून गेली.
आणि मी त्या माणसांचेच विचार करत बसले. मग
पुन्हा झोप येण्यासाठी मी माझा आवडता खेळ चालू केला. मी
मेंढरं मोजू लागले :) डोळ्यासमोर मेंढरं आणली. ती इकडेतिकडे पळत होती. मी त्यांना एक एक करत मोजत
होते.
...मगाशी लावलेली मेणबत्ती विझली वाटतं. पुन्हा लावायला
हवी...
...इकडे ती मेंढरं रानोमाळ होऊन गेली.पण पुन्हा मी
त्यांना गोळा केलं. पुन्हा मोजायला सुरुवात. मोजता मोजता एक छोटी डुलकी लागली. पुन्हा मेणबत्ती
विझली की काय अशा धसक्याने जाग आली. एकच पणती मिणमिणत होती.
चटकन उठून नवीन पणत्या लावल्या. जेवण करून
चारपाच तास उलटले होते, आता भुकेची जाणीव झाली. अंधारात खुडबुडत शोधलं, बिस्किटं हाताला लागली.
एकेक खात बसले.
आता देवळातून घंटानाद ऐकू येऊ
लागला. आणि आरत्याही. म्हणजे ही
मंडळीही शिवरात्रीची पूजा करायला आलेली आहेत तर. असूदेत.
पूजेसाठी आली आहेत, भली असतील बिचारी.
.....पण तरी एवढ्या मिट्ट काळोखात???
मोबाईलमधे अकराचा गजर झाला.
..म्हणजे आता उजाडायला सातच तास उरले! हे
चांगलं आहे. आता आपण असंच उजाडायला किती वेळ उरला ते मोजत
बसुया. थोड्या थोड्या वेळानं घड्याळ पाहू लागले. सहा तास पंचेचाळीस मिनिटे.. सहा तास पस्तीस मिनिटे..
मग मी या तिघांच्या श्वासांची गंमत ऐकत बसले. तिघांचे
श्वास वेगवेगळ्या लयीत आणि पट्टीत चाललेले. वेदूचा श्वास
किंचित जलद आणि त्याच्या श्वासानंतर एक बारीकसा कुईं असा आवाज. विद्याधीशचा श्वास एकदम संथ लयीतला. जगदीशच्या
श्वासाच्या आवाजाची वरची पट्टी आणि उच्छवासात थोडा घोरल्यासारखा आवाज.. सगळे आवाज घुमत होते. मुलं बिनघोर झोपली होती.
त्यांनी स्वतःला आमच्यावर सोपवलं आहे. जगदीशही
गाढ झोपलाय. त्यानं स्वतःला कोणावर सोपवलंय? कसल्या विश्वासावर तो इतका बिनघोर झोपू शकतो? तो
विश्वास मलाच का वाटत नाही?
मधेच त्या लांबच्या वस्तीवरचे
लुकलुकणारे दिवे फक्कन विझले. वीज गेली वाटतं तिथली. लवकर परत येऊदे.
एकचा गजर झाला. बाहेर त्या माणसांची पूजा उरकली असावी. आता त्यांनी
पुन्हा थोडे फ़टाके वाजवले आणि परत शिवाजी महाराजांच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
कोण आहेत हे? आणि अशा अपरात्री हे सगळे प्रकार
का करतायत? मी पुन्हा जगदीशला उठवलं. तो
म्हणाला, अगं निर्मनुष्य ठिकाण आहे. जाग
रहावी म्हणून करत असतील आरडाओरडा. ते आहेत सोबतीला. झोप बिनधास्त.
मी प्रयत्न करतच होते डोक्यातली चक्रं थांबवण्याचा. पण नव्हतं
जमत मला.
हळूहळू खालचे आवाज शांत होत
गेले. मंडळी देवळातच झोपलेली असणार. आता
मलाही जरा हलकं वाटू लागलं. डोळ्यावर झोप दाटू लागली.
कधीतरी विचारांची चक्रं थंडावली आणि मी झोपून गेले. तीनच्या गजराने जाग आली, तेव्हा गुहेतले सगळे दिवे
विझले होते. अंधारगुडुप होता. पण आता
मला त्याचं काहीच वाटलं नाही. ...आता तीनच तास राहिले या
भावनेचाही परिणाम असेल. अंधार छान वाटत होता, पण उजेड हवाच होता. पुन्हा उठून पणत्यांचं नवीन
पाकीट फ़ोडलं आणि चारपाच पणत्या लावल्या. पुन्हा सगळे बारीक
बारीक आवाज टिपत बसले. समोरच्या वस्तीतले दिवे पुन्हा
लुकलुकू लागले होते. चला बरं झालं.
नंतर असाच कधीतरी पाचचा गजर
झाला. मग मात्र आम्ही दोघेही उठलो. त्याच
मिणमिण उजेडात बांधाबांध करायला सुरुवात केली. पहाटेच्या
अंधाराची भीती नाही वाटत.
हळूहळू गुहेसमोरच्या
झाडांच्या आकृती स्पष्ट होऊ लागल्या आणि मग फ़टफ़टलंच. कालची
मंडळी कुठे झोपली होती कुणास ठाऊक. आम्ही पटापट आवरून देवळात
गेलो. देवळात, कडेच्या ओवर्यांमधे ,
गुहांमधे, सगळीकडे बघितलं पण कोणीच नाही!
....म्हणजे? पूजा करून, जोरजोरात
घोषणा देऊन, फ़टाके वाजवून ते रात्रीच परत गेले? एक वाजता??
काय
विलक्षण माणसं!
......माणसंच होती ना??!!
काल
बाहेर येऊन पहायला हवं होतं. मला चुटपुट लागून राहिली!
गडमाथ्यावरचे
ढग, धुकं, कालची कोकणकड्याची, इंद्रधनुष्याची
दृश्यं, आणि कालची क्षण क्षण अनुभवत काढलेली रात्र.. सगळं मनात, डोळ्यात साठवत आम्ही गड उतरू लागलो.
यथावकाश
फटाक्यांच्या,
रोषणाईच्या, माणसांच्या, यंत्रांच्या, वहानांच्या, माणसांच्या,
इमारतींच्या, धुराच्या, लखलख
चंदेरी जगात परत आलो.
गाडीतून
उतरलो, तर बिल्डिंगसमोर हजार फ़टाक्यांची माळ लावलेली. आमचं
बोलणंही एकमेकांना ऐकू येईना. वेदात्मन त्या आवाजाला घाबरून
मला घट्ट बिलगून जोरजोरात रडू लागला. रडतारडताच म्हणाला,
"आई, कशाला आलो आपण इथे. काल किती छान होतं गडावर....."