लग्नानंतरचे मंतरलेले दिवस! आम्ही काठमांडू-पोखरा-चितवन असा दौरा आखला होता.१२ जुलै १९९८ रोजी आम्ही पोखर्यात होतो. जिथे उतरलो होतो ते होतं ’लेक व्ह्यू रिसोर्ट’. पोखर्यातील ’फ़ेवा ताल’च्या जवळचं. तिथे पोचलो आणि हरखलोच. एकतर दिवस ते तसे - आकाश-पाणी-तारे-वारे सजीव असणारे - त्यात सरोवराकाठचा निवास-मधेच दर्शन देणारी शुभ्रधवल हिमशिखरे-आल्हाददायक हवा- वा वा वा! एकदम रोमॅंटिक सिच्युएशन! पुन्हा, लग्नाला आठच दिवस झालेले.त्यामुळे जगदीश जे काय म्हणेल त्याच्यावर मी विश्वासच ठेवायचे. त्याच्या कित्येक वाक्यांचे, शब्दांचे त्याला अभिप्रेत असणारे अर्थ आणि मला माहिती असणारे सर्वसामान्य अर्थ यातला फ़रक मला अजून कळायचा होता. त्याची अवघड-सोपे, लांब-जवळ, सोय-गैरसोय याची परिमाणेही मला समजलेली नव्हती. त्यामुळे ’अगं बरोबर आहे हा रस्ता’ असं तो म्हणाला की मी डोळे झाकून त्याच्याबरोबर जायचे. तो ’अगं जवळच आहे ते फ़लाणं ठिकाण’ असं म्हणाला की मीच म्हणायचे - मग जाऊ चालत चालत. तोही हे सगळं इतक्या ठामपणे सांगायचा (आणि अजूनही सांगतो) की मीच काय, माझ्याजागी दुसरी कोणीही असती तरी तिने विश्वासच ठेवला असता.
तिथे गेल्यावर आम्ही फ़ेवा लेककडे गेलो. तर तिथे बोटिंगचीही सोय होती. अरे वा! मी मागे वळून जगदीशशी काही बोलेपर्यंत तो बोटिंगची चौकशी करायला गेलाही. परत आल तो हर्षोत्फ़ुल्ल चेहेर्यानेच. कारण तिथे त्यांच्या नावाड्याशिवायही नाव घेऊन गेलेलं चालणार होतं. म्हणजे बाकी कोणी तसे जाताना दिसत नव्हते, पण यानं बहुदा त्यांच्याशी ’कृष्णामाई’च्या गप्पा मारल्या होत्या. त्यामुळं त्यांनीही त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. मीही त्याचं नौकानयन कौशल्य पाहिलं नसलं तरी घरची नाव पाहिली होती, त्याच्याकडून आणि बाकीच्यांच्याकडूनही बरंच काही ऐकलं होतं. तरीही मी आपलं एकदा विचारुन घेतलं - जमेल नं तुला? मला काही पोहता वगैरे येत नाही हं’ त्यावर त्याचं उत्तर, चल गं, होऊन होऊन काय होईल? आणि मी आहे ना!
मग मलाही वाटलं. आम्हा दोघांमधे तो नावाडी कशाला उगीचच (तेही घरचा नावाडी असताना).
मग गेलो आम्ही नौकाविहारासाठी.
तिथल्या होड्या सांगलीसारख्याच लांबूळक्या, पण जर लहान होत्या. आणि तिला इकडच्यासारखी दोन वल्ही नव्हती. एकच उलथन्यासारखे वल्हे, त्याला चप्पू म्हणायचे. ते एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे मारायचे. जगदीशने त्याची सगळी माहिती करुन घेतली. मीही बिनधास्त होते. होऊन होऊन काय होणार?!!
आमचा नौकाविहार चालू झाला. मी मस्त इकडे तिकडे बघत, गप्पा मारत, पाण्यात हात घालत मजेत बसले होते. होडीत आणखे एक ज्यादा वल्हं होतं. मी उगाचच चार वल्ही मारली. पण दोघांनी विरुद्ध दिशेला वल्ही मारल्यावर होडी गोल गोल फ़िरते आहे हे लक्षात आल्यावर ते ठेवून दिलं. किनारा लांब लांब गेला. बाकीही नावा लांबच होत्या. आ हा! विस्तीर्ण, निळा जलाशय, तशात मंद मंद वारा सुटलेला.....आम्ही सगळ्या जगापासून लांब.. दोघेच दोघे..सूख सूख म्हणतात ते हेच...नाविकाsss चल तेथे...
"अरे अरे! एवढ्यात कशाला परतायचं. जाऊ ना अजून पुढं. वेळही आहे अजून आपल्याकडे"
"मी कुठे परत फ़िरलोय - नाव आपोआपच फ़िरतेय.."
"!!!!"
"वार्यामुळे लाट उठलीये त्यामुळी हवी तिकडे नेता येत नाहीये"
"???"
"छ्या! सांगलीला दोन दोन वल्ही असतात. हे असलं एका उलथन्याचं काही जमत नाहीये. काही ताकदच लावता येत नाहीये."
आमची नाव पुढेही जात नव्हती आणि मागेही येत नव्हती. जगदीश जोरजोरात वल्हं मारत होता. आणि वल्हवता वल्हवता, ,तशातही मला नाव वल्हवण्याची थिअरी समजावून सांगत होता.
"एरवी ना आपण असं असं वल्हं मारुन पाणी मागे सारतो. हे असं वल्हं मारलं की नाव इकडे वळवता येते.असं मारलं की तिकडे.. पण अशी लाट उठली ना की काही उपयोग होत नाही. काय होतं की........................
मला पुढचं काहीही ऐकू येईना.
थोड्या वेळात तोही घामाघूम झाला. चेहेराही जरा वेगळा वाटू लागला - साहजिकच होतं - लग्नाला आठच दिवस झालेले, परक्या मुलुखात, भर सरोवरात नाव फ़सलेली, दूरवर कोणी नाही... मग मी त्याच्याकडे तोंड करून बसले होते, ती उठले आणि उलटी, त्याच्याकडे पाठ करून बसले. ते जास्तीचं वल्हं घेऊन, त्याच्या वल्हवण्याच्या वेगाशी synchronise करून मीही त्याच्या बरोबरीने वल्हं मारू लागले.
डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे...
काहीही उपयोग नाही. नाव आपली होती तिथेच.
होऊन होऊन काय होणार..... देवा रे! काय होणार....???
दोघे वल्ही मारून मारून अक्षरशः बेजार झालो. पण नावेचं डळमळणं आणि तिथल्या तिथेच घुटमळणं काही थांबेना. माझं डोकं बधीर झालं. इकडे तिकडे पाहिलं तर दूरवर एक नाव दिसली. सुचेल त्या प्रकारे त्या नावेतल्यांना हाका मारायला सुरुवात केली. जगदीशही हाका मारू लागला. त्याही ऐकू जाईनात. मग मी कॅमेर्याच्या बॅगेतलं कॅमेरा पुसायचं कापड काढून हलवायला लागले आणि जगदीश तोंडात बोट घालून जोरजोरात शिट्ट्या मारू लागला.
शेवटी त्या नावेतल्या माणसांना समजलं की काहीतरी गडबड आहे. ते झपाझप वल्ही मारत आमच्याकडे येऊ लागले.त्यालाही जवळजवळ दहा मिनिटे लागली. तोपर्यंत आम्ही तर थकून गेलो होतो पण कोणीतरी मदतीला येतंय हा दिलासा खूप होता. तो आमचा तारणहार जवळ आला. त्याच्या नावेत दोन नावाडी होते. त्या दुसर्याकडे वल्हं देऊन तो उडी मारून आमच्या नावेत आला. आम्ही आमचं वल्हं त्याच्याकडे सोपवलं आणि त्याने यथावकाश आमची जीवननैया किनार्याला लावली. आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. हात घट्ट धरून काठावरच्या एका ठिकाणी गेलो. बाहेर थंडी नसतानाही मला हुडहुडी भरली होती. (अंगारकी चतुर्थी असतानाही...)जगदीशने थंडी पळवणारी पेये मागवली. ती पिऊन आम्ही जरा हुश्शार झालो. अनोळखी ठिकाणच्या पाण्याशी मस्ती करायला जायचं नाही असं ठरवलं.
मग दुसर्या दिवशी पोखर्यातल्याच ’बेगनास ताल’ मधे आणखी एक जोडपं आणि नावाडी यांच्याबरोबर बोटिंगला गेलो!
नंतर सांगलीत आल्यावर जगदीश आणि मंडळींचं पुराच्या तांबड्यालाल पाण्यातलं नावा चालवणं पाहिलं. विद्याधीशच्या वेळी त्याच्या नावेतून नदीत चक्कर मारली, विद्याधीश लहान असताना तिथल्या प्रथेप्रमाणे जगदीशच्याच नावेतून जाऊन कृष्णाबाईची ओटीही भरली.
पण पोखर्याचा हा अनुभव गाठीशी असल्याने जगदीशच्या कुठल्या बोलण्याचा कसा अर्थ घ्यायचा असतो आणि त्याने सांगितलेल्या कोणत्या गोष्टीवर डोळे झाकून कधी आणि डोळे उघडे ठेऊन कधी विश्वास ठेवायचा असतो हे मात्र पुरेपूर शिकले.
Thursday, July 22, 2010
चांदणवेळा
आजोळी नाना प्रकारची फ़ुलझाडं होती. त्यातच, अंगणाकडेला मोगर्याचा वाफा होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे जायचो तेव्हा मोगरा बहरलेला असायचा. देवांना मोगर्याचे हार, पिण्याच्या पाण्यात मोगरा, आमच्या केसात मोगरा असे ते मोगर्याचे दिवस असत. आम्ही सगळे ओटीवर झोपत असू. समोरच्या अंगणात मोगरा असे. झोपायच्या वेळी त्याच्यावरच्या कळ्या अर्धवट उमलू लगलेल्या असत. एकदा मोगर्यापाशी जाऊन, त्याला हात न लावता, जागं न करता लांबूनच त्याचा वास घ्यायचा आणि मग झोपायचं अशी माझी नेहमीची सवय.
एकदा, कशाने कुणास ठाऊक.. मला अपरात्रीच अगदी लख्ख जाग आली. बाहेर पाहिलं तर टिपूर चांदणं होतं आणि लक्ष गेलं, तर मोगर्याच्या कळ्या टप्पोर उमललेल्या! उठले, मोगर्याजवळ गेले...
शुभ्र फ़ुलं... शुभ्र चांदणं... उन्हाळ्यातल्या रात्रीचा सुखद गारवा... आणि चांदण्यात न्हाणार्या मोगर्याचा परिमळ..!
...मोगर्याचा, की चांदण्याचा?
.... चांदणगंध? दरवळणारं चांदणं?
कितीतरी वेळ तिथे बसून राहिले. डोळे मिटून तो गंध भरभरून घ्यावा, तर ती चांदणफ़ुलं क्षणभरही नजरेआड करवेनात!
आजुबाजूचं पानही हलत नव्हतं..सगळं झोपलं होतं. फ़क्त मी जागी होते आणि माझ्याबरोबर तो अवचिता परिमळु!
कशानं जाग आली होती मला? मोगर्यानं मला गंधाचं आवातणं पाठवलं?
खूप वेळ बसले तशीच- तो गंधसोहळा अनुभवत. मग वाटलं, आता कोणी उठलं, तर उगीच सतरा प्रश्नांना उत्तरं देत बसावं लागेल. नकोच ते.
उठले आणि हळूच अंथरुणात शिरले.
ती आठवण त्यादिवशीच्या चांदण्याइतकीच लख्ख आहे.
--------
हुरड्याच्या दिवसात आमच्या गावाला गेले होते. पहाटे पहाटे बाबा शेतात एक चक्कर मारायला जात. त्यादिवशी मलाही त्यांच्या बरोबर जाग आली. ते म्हणाले, चल येतेस का माझ्याबरोबर. मी स्वेटर, चप्पल घालून, बॅटरी घेऊन तयार झाले. पहाटेचे पाच साडेपाच झाले असतील. काहीतरी बोलत बोलत आम्ही शेताच्या वाटेला लागलो. मग आम्ही आकाश बघायला लागलो. बाबा मला नक्षत्रांची कायकाय नावं सांगु लागले. चांदण्या बघत बघत चालणं जरा त्रासाचंच होतं. शेवटी शेतातला गोठा आणि बाबुकाकांची झोपडी हाकेच्या अंतरावर आली, तेव्हा बाबांना म्हणाले, जा तुम्ही . मी येते मागून. ”लवकर ये आणि बाबूच्या खोपटात थांब’ ते म्हणाले. आणि पुढे गेले.
मग मी जरा आजुबाजुला बॅटरी मारली आणि बसलेच त्या धूळभरल्या वाटेवर चांदण्या बघत. तरीही नीट दिसेनात. मग सरळ एक दगड उशाला घेऊन आडवी झाले. आता बेष्ट दिसत होतं.
....चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे... !
एकीकडे आकाशगंगेचा पिठूर पट्टा- चांदण्यांच्या वाळूचा. सन्यस्त ध्रुव आणि लखलखता शुक्र. मधेच कुठे ढळणारा तारा. एकीकडे सप्तर्षी - तिकडे सप्तर्षींना मामाभाच्याचा नांगर म्हणत - पुढे दोन मामाचे बैल, मागे दोन भाच्याचे बैल, त्यांच्या मागे मामा, मग भाचा आणि कडेला टोपलीत भाकरी घेऊन आलेली मामाची पोरगी.
पुण्यात फ़क्त डोक्यावरच्या आकाशाच्या तुकड्यातच चांदण्या दिसतात. तिथे त्या क्षितिजरेषेपर्यंत दिसत. अपलक नजरेनं ते आकाश डोळ्यात साठवून घेत राहिले. चांदणभरलं आकाश आणि चांदणभारली पहाट!
"कुटं हायसा.." म्हणून भरड आवाजातली बाबुकाकांची हाक आली. मग धूळ झटकून उठले आणि त्याच्या खोपटासमोरच्या शेकोटीच्या उबेला जाऊन बसले.
-----
उन्हाळ्याच्या सुट्टीत दापोलीला मैत्रिणीच्या घरी जमलो होतो. एक दिवस हर्णैला समुद्राकाठी MTDC च्या तंबूत रहायचं आणि सकाळी उठून चालत चालत आसूदला जायचं असा बेत ठरवला. समुद्राकाठची तंबूची सोय मस्तच होती. रात्री उशीरापर्यंत पत्ते खेळून झोपायला गेलो. सगळे झोपले. समुद्राची गाज अखंड कानावर येत होती. चांदण्याची एक चुकार तिरीप तंबूत डोकावत होती. मैत्रिणीला हळूच हाक मारली. तीही जागीच होती. हलक्या पावलांनी दोघी बाहेर आलो. आणि तंबूजवळच्या वाळूत पाय पोटाशी घेऊन, हात बांधून, काही न बोलता बसून राहिलो. चांदणं.. समुद्राची गंभीर गाज.. त्याचं चकाकणारं पाणी.. फ़ेसाळणार्या लाटा.. लाट मागे गेल्यावर चमकणारी ओली वाळू.. जहाजांचे दिवे.. माडांच्या झावळ्या.. त्यातून झिरपणारं चांदणं.. सगळंच अदभुत! कितीवेळ अशा भारलेल्या अवस्थेत बसलो होतो कुणास ठाऊक. कुठे गेल्या दोघी म्हणून तिच्या बहिणीनं घाबरून हाक मारली तेव्हा भानावर आलो. हसून आत जाऊन झोपी गेलो.
Subscribe to:
Comments (Atom)