एकदा, कशाने कुणास ठाऊक.. मला अपरात्रीच अगदी लख्ख जाग आली. बाहेर पाहिलं तर टिपूर चांदणं होतं आणि लक्ष गेलं, तर मोगर्याच्या कळ्या टप्पोर उमललेल्या! उठले, मोगर्याजवळ गेले...
शुभ्र फ़ुलं... शुभ्र चांदणं... उन्हाळ्यातल्या रात्रीचा सुखद गारवा... आणि चांदण्यात न्हाणार्या मोगर्याचा परिमळ..!
...मोगर्याचा, की चांदण्याचा?
.... चांदणगंध? दरवळणारं चांदणं?
कितीतरी वेळ तिथे बसून राहिले. डोळे मिटून तो गंध भरभरून घ्यावा, तर ती चांदणफ़ुलं क्षणभरही नजरेआड करवेनात!
आजुबाजूचं पानही हलत नव्हतं..सगळं झोपलं होतं. फ़क्त मी जागी होते आणि माझ्याबरोबर तो अवचिता परिमळु!
कशानं जाग आली होती मला? मोगर्यानं मला गंधाचं आवातणं पाठवलं?
खूप वेळ बसले तशीच- तो गंधसोहळा अनुभवत. मग वाटलं, आता कोणी उठलं, तर उगीच सतरा प्रश्नांना उत्तरं देत बसावं लागेल. नकोच ते.
उठले आणि हळूच अंथरुणात शिरले.
ती आठवण त्यादिवशीच्या चांदण्याइतकीच लख्ख आहे.
--------
हुरड्याच्या दिवसात आमच्या गावाला गेले होते. पहाटे पहाटे बाबा शेतात एक चक्कर मारायला जात. त्यादिवशी मलाही त्यांच्या बरोबर जाग आली. ते म्हणाले, चल येतेस का माझ्याबरोबर. मी स्वेटर, चप्पल घालून, बॅटरी घेऊन तयार झाले. पहाटेचे पाच साडेपाच झाले असतील. काहीतरी बोलत बोलत आम्ही शेताच्या वाटेला लागलो. मग आम्ही आकाश बघायला लागलो. बाबा मला नक्षत्रांची कायकाय नावं सांगु लागले. चांदण्या बघत बघत चालणं जरा त्रासाचंच होतं. शेवटी शेतातला गोठा आणि बाबुकाकांची झोपडी हाकेच्या अंतरावर आली, तेव्हा बाबांना म्हणाले, जा तुम्ही . मी येते मागून. ”लवकर ये आणि बाबूच्या खोपटात थांब’ ते म्हणाले. आणि पुढे गेले.
मग मी जरा आजुबाजुला बॅटरी मारली आणि बसलेच त्या धूळभरल्या वाटेवर चांदण्या बघत. तरीही नीट दिसेनात. मग सरळ एक दगड उशाला घेऊन आडवी झाले. आता बेष्ट दिसत होतं.
....चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे... !
एकीकडे आकाशगंगेचा पिठूर पट्टा- चांदण्यांच्या वाळूचा. सन्यस्त ध्रुव आणि लखलखता शुक्र. मधेच कुठे ढळणारा तारा. एकीकडे सप्तर्षी - तिकडे सप्तर्षींना मामाभाच्याचा नांगर म्हणत - पुढे दोन मामाचे बैल, मागे दोन भाच्याचे बैल, त्यांच्या मागे मामा, मग भाचा आणि कडेला टोपलीत भाकरी घेऊन आलेली मामाची पोरगी.
पुण्यात फ़क्त डोक्यावरच्या आकाशाच्या तुकड्यातच चांदण्या दिसतात. तिथे त्या क्षितिजरेषेपर्यंत दिसत. अपलक नजरेनं ते आकाश डोळ्यात साठवून घेत राहिले. चांदणभरलं आकाश आणि चांदणभारली पहाट!
"कुटं हायसा.." म्हणून भरड आवाजातली बाबुकाकांची हाक आली. मग धूळ झटकून उठले आणि त्याच्या खोपटासमोरच्या शेकोटीच्या उबेला जाऊन बसले.
-----
उन्हाळ्याच्या सुट्टीत दापोलीला मैत्रिणीच्या घरी जमलो होतो. एक दिवस हर्णैला समुद्राकाठी MTDC च्या तंबूत रहायचं आणि सकाळी उठून चालत चालत आसूदला जायचं असा बेत ठरवला. समुद्राकाठची तंबूची सोय मस्तच होती. रात्री उशीरापर्यंत पत्ते खेळून झोपायला गेलो. सगळे झोपले. समुद्राची गाज अखंड कानावर येत होती. चांदण्याची एक चुकार तिरीप तंबूत डोकावत होती. मैत्रिणीला हळूच हाक मारली. तीही जागीच होती. हलक्या पावलांनी दोघी बाहेर आलो. आणि तंबूजवळच्या वाळूत पाय पोटाशी घेऊन, हात बांधून, काही न बोलता बसून राहिलो. चांदणं.. समुद्राची गंभीर गाज.. त्याचं चकाकणारं पाणी.. फ़ेसाळणार्या लाटा.. लाट मागे गेल्यावर चमकणारी ओली वाळू.. जहाजांचे दिवे.. माडांच्या झावळ्या.. त्यातून झिरपणारं चांदणं.. सगळंच अदभुत! कितीवेळ अशा भारलेल्या अवस्थेत बसलो होतो कुणास ठाऊक. कुठे गेल्या दोघी म्हणून तिच्या बहिणीनं घाबरून हाक मारली तेव्हा भानावर आलो. हसून आत जाऊन झोपी गेलो.
No comments:
Post a Comment