Friday, March 26, 2010

बाभुळझाड















बाभळी
लवलव हिरवीगार पालवी - काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे - फांदी तर काळोखी काळी
झिरमिळ करती शेंगा नाजूक - वेलांटीची वळणे वळणे
या सार्‍यातुनि झिरमिर झरती - रंग नभाचे लोभसवाणे
कुसर कलाकृति अशी बाभळी - तिला न ठावी नागर रीती
दूर कुठेतरी बांधावरती - झुकून जराशी उभी एकटी
अंगावरती खेळवि राघू - लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनिया मन - रमते तेथे सांज सकाळी
येते परतुन नवेच होऊन - लेवुन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखुन अवघ्या - धुंद सुवासिक पिवळे उटणे॥
बाभळीची झाडं लहानपणापासुन परिचयाची. पण इंदिरा संतांची ही कविता माहिती झाली आणि त्या झाडाकडे बघण्याची दृष्टीच बदलली. लवलवणारी नाजुकशी काळपट हिरवी पानं, घमघमणारे पिवळ्या फ़ुलांचे लोलक, झिरमिळ्यांसारख्या वळणावळणाच्या शेंगा आणि त्यातुन झिरमिर झरणारे आभाळाचे रंग! पायाशी कायम बकरीची पोरे खेळवणारी ही लेकुरवाळी बाभळीबाई आणि ही कविता यांचं तेव्हापासुनचं घट्ट नातं. बाभुळ दिसली की कविता आठवणार आणि कविता आठवली की बांधावरची बाभुळ डोळ्यांपुढे येणार.


पण नुकतीच एक मेलमधे वसंत बापटांची ’बाभुळझाड’ ही कविता वाचनात आली.



अस्सल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ॥
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसुन बोटे
बाभुळझाड उभेच आहे ॥
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ॥
जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांद्यावरती सुतारांचे
घरटे घेऊन उभेच आहे ॥


ही कविता वाचली आणि ती बांधावरची लेकुरवाळी बाभळीबाई डोळ्यांपुढे आली नाही. आठवले ते माझे पणजोबा. शंभरी ओलांडलेले, त्यांच्या शेवटच्या दिवसांतले. माझ्या आईच्या आईचे वडील. अंगात मळकट पांढरं धोतर, सदरा आणि डोक्याला तसाच सुरकुतलेला पांढरा फ़ेटा. सातार्‍याजवळच्या वर्ये गावाचे ते इनामदार. माझ्या आईच्या, आजीच्या आठवणीतलं त्यांचं घर फ़ार वेगळं होतं. इनामदारांचा वाडा. रोजचा पाच-पंचवीस जणांचा राबता. तिथे मोठं देवघर होतं. रोज सकाळी पूजेसाठी काढलेल्या परसातल्या गावठी गुलाबाच्या ताज्या टोपलीभर फ़ुलांनी ते घमघमायचं. ’ अठरा धान्ये हिरव्या रानी -भरल्या कणग्या भरल्या गोणी’ असं ते समाधानी घर होतं. कालवशात ते सगळं नष्ट होत गेलं. माझ्या आठवणीतलं ते घर म्हणजे ’भिंत खचली कलथून खांब गेला’ असंच. पडझड झालेलं, मोडकळीला आलेलं, उखीरवाकीर. पणजोबांनी ही सारी स्थित्यंतर पाहिली. सगळं पहात, वारा खात - गारा खात ते भक्कम गाठीचं बाभुळझाड उभंच राहिलं.
अगदी लहान असताना मी वर्य़ाला जायचे, तेव्हा ते मला हाताशी धरुन आंब्याच्या बागेत, मारुतीच्या देवळात जायचे. भेटणार्‍यांना म्हणायचे, तुमच्या नशिबी आहे का असं पणतीच्या हाताला धरुन देवळात येण्याचं भाग्य! एकदा आजोळी, शिरोळला आम्ही जमलो होतो. तेही त्यांच्या लेकीकडे आले होते. त्यांना नरसोबाच्या वाडीला जायचंहोतं म्हणुन टांगा ठरवला होता. सकाळी टांगा आल्यावर कोणीतरी- मामा वगैरे मंडळी त्यांच्याबरोबर जायला निघाली. पण ते मात्र लहान मुलासारखा हट्ट धरुन बसले- माझ्याबरोबर कोणीही यायचं नाही. आज फ़क्त मी आणि द्वारकू (माझी आजी, त्यांची लेक) जाणार वाडीला! सगळ्यांनी मान्य केलं. आणि सत्तरी गाठणारी द्वारकू नव्वदी ओलांडलेल्या वडिलांना हाताला धरुन टांग्यातुन वाडीला घेऊन गेली! अशी आतड्याच्या नात्यांची, आपुलकीच्या धाग्यांची घरटी त्यांच्या अंगाखांद्यावर शेवटपर्यंत होती.
एकशेपाच वर्षांचे होऊन ते गेले. त्यांनी लावलेल्या आंब्याच्या बागेत त्यांची शंभरी साजरी झाली. त्यानंतर ते खूप थकत गेले. पण तरीही शेवटपर्यंत हसते बोलते होते. त्या कवितेतल्या हळद विटलेल्या, लवलव मिटलेल्या, पण तरीही ताठ राहिलेल्या बाभुळझाडासारखेच.

No comments:

Post a Comment