Sunday, November 7, 2010

रात्र काळी....


रात्र काळी....

      सततच्या शहरी गजबजाटातून, झगमगाटातून चार निवांत क्षण नेहमीच हवेहवेसे असतात. विशेषतः दिवाळीच्या रोषाणाईच्या आणि फटाक्यांच्या दिवसात तर पुण्यात रहाणं म्हणजे शिक्षा होऊन जाते. मग पाठपिशव्या खांद्यावर टाकायच्या, तहानलाडू-भूकलाडू बरोबर घ्यायचे आणि एखाद्या गडावर नाहीतर निवांत स्थळी दोन दिवस मुक्कामाला जाऊन राहायचं हा आमचा नेहमीचा परिपाठ. त्यावर्षी हरिश्चंद्रगड ठरवला होता. आम्ही दोघं आणि मुलं. पुण्यातून सकाळी निघून पांचनईच्या वाटेने दुपारी दोनच्या सुमारास हरिश्चन्द्रगडावर पोचल्यानंतर देवळं, गुहा वगैरे फ़िरुन गणेशगुहेत विसावलो. त्यावर्षी पावसाळा अंमळ लांबला होता. ऐन दिवाळीतही पावसाने हजेरी लावलेली. गडावर मधेच आलेली पावसाची सर, मग खास आमच्यासाठी समोर अवतरलेलं इंद्रधनुष्य, कोकणकड्याचं विस्मयकारी दर्शन, असं सगळं अनुभवून आम्ही पुन्हा गणेशगुहेत आलो.
      खूप गर्दी असते गडावर’.. ’दिवाळीत तर नुसता बाजार असतो’... ’हल्ली तिथे खायला जेवायलाही मिळतं’...’सकाळी सकाळी कांदेपोहे मिळतात’.. या आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे अद्याप काहीच घडलं नव्हतं. आमच्याबरोबर गड चढलेले पाचनईतले तीन गावकरी हरिश्चन्द्रेश्वराची पूजा करुन परत फिरले होते. त्यांच्यानंतर दोघंजण आले. आम्हाला वाटलं, ते तरी गडावर रहाणार असतील. पण साडेपाचच्या सुमारास तेही परत फिरले. शिवरात्र होती म्हणून ते पूजेसाठी खालच्या गावांमधून आले होते. त्यांनी सर्वांनीच सांगितलं की गडावर एकट्यानं राहायलाही काहीच भीती नसते. बिनघोर रहा. मुलंही दमली होती, आणि आमच्याबरोबर संध्याकाळच्या जेवणाची सोय होती. अशा सगळ्या कारणांमुळं आम्ही रात्र गडावरच काढून सकाळी उजाडताच गड उतरायचा असं ठरवलं.
      पाऊस पडून गेला होता. अजून आभाळ होतं. त्यामुळं अंधारलेलंच होतं. संध्याकाळ दाटत चालली होती. आपण चौघंच गडावर रहाणार हे स्वीकारायची माझी अजूनही तयारी होत नव्हती. मला वाटत होतं की पुण्यामुंबईकडचा एखादा वाट चुकलेला, उशीरा निघालेला गट अजूनही संध्याकाळी उशीरापर्यंत येईल गडावर मुक्कामाला .. पण काहीच नाही. गुहेत आधीच अंधार होता. त्यात आता आजूबाजूचं काही नीट दिसेना. देवळात लावण्यासाठी आम्ही पणत्या घेऊन गेलो होतो. आम्ही त्या पणत्या लावल्या. त्या उजेडात एक पत्त्यांचा डाव खेळून झाला. मग शुभंकरोति म्हणून झालं. मग अजून काही स्तोत्रं वगैरे. आता काय? मुलांना भूक लागली. मग पराठे खाऊन झाले. आम्हीही खाल्लं. संध्याकाळचं जेवणच झालं. मुलं पेंगुळली. पथार्‍या पसरलेल्याच होत्या, सव्वासात वाजत नाहीत तो दोघं पांघरुणात गुरगुटून गाढ झोपलीही. काहीबाही बोलत आम्हीही आडवे झालो. जगदीशला लगेच डुलकीही लागली. माझे डोळे मात्र मिटेनात.
      गणेश गुहा छानच होती. एका बाजूला मोठी गणपती बाप्पाची मूर्ती, पंचवीस तीस माणसं आरामात झोपू शकतील अशी प्रशस्त, स्वच्छ. दोनचार पाकोळ्या सोडल्या तर कुठे किडामुंगीही नाही अशी. पणत्यांच्या मिणमिण उजेडात तिथे छान वाटत होतं. पण ते वातावरणच असं होतं की मला झोप येईना. दूरवर वीज लवत होती. गडगडाट ऐकू येत नव्हता, नुसतीच विजेची रेघ दिसायची. पाऊस पडून गेल्याने गुहेच्या तोंडाशी पागोळ्या गळत होत्या. गुहेबाहेरच्या झाडांच्या आकृत्या पुसट होतहोत आता दिसेनाशा झाल्या होत्या. दूरवर एका वस्तीवरचे दिवे लुकलुकत होते. मुलं झोपेत चुळबुळल्याने जरासाही पांघरुणाचा आवाज झाला, तरी तो गुहेत घुमत होता. मग मी तो पागोळ्यांचा आवाज ऐकत बसले. त्याचीही एक गंमत होती. पागोळ्यांच्या एकसुरी टिपिक टिपिक आवाजात मधेच एक वरच्या पट्टीतला टुबुक टुबुक असा आवाज काही वेळ येई. साताठ वेळा असा आवाज होऊन तो बंद होई. मग पुन्हा टिपिक टिपिक. मधेच बाहेरच्या पाण्याच्या कुंडातून आवाज आल्यासारखा वाटला. काय असेल? दुपारी त्या पाण्यात आम्ही एक पिवळाजर्द पाणसाप पाहिला होता. तो तर नसेल? मधेच एक वार्‍याची लहर.. मग पानांवरून पाणी गळल्याचा आवाज..
घड्याळात पाहिलं तर अजून आठही वाजले नव्हते. पुन्हा आडवी झाले. डोक्यातली चक्रं काही थांबेनात. गडाचा प्राचीन इतिहास... चांगदेव, ज्ञानदेवांसारख्यांनी इथे वास केलेला...कशाकशाच्या साक्षीदार आहेत या गुहा? ही गणपतीची मूर्ती कोणी घडवली असेल? एक ना दोन.
      मधेच वेदू झोपेत चाळवला आणि मी पुन्हा वर्तमानात आले. गुहेच्या वरच्या डोंगरावर किर्र जंगल आहे. तिथं कोणती श्वापदं असतील? वाघ, बिबटे असतील? एखादा डोकावून जात असणार इकडे अधूनमधून. खरंच एखादा इकडे डोकावला तर? छे! मला जागं राहायला हवं! मी मोबाईलमधे दोन दोन तासांच्या अंतराने गजर लावून ठेवले. दिवाळीतले दोनचार भुईनळे ठेवायला हवे होते जवळ. वाघबिघ आला असता तर भुईनळे लावून पळवून लावलं असतं....!!!! आता मात्र मला एकटीलाच हसू यायला लागलं. बळेबळे डोळे मिटून डोळेही दुखू लागले. मग पुन्हा उठून बसले. तर  अस्पष्ट असा माणसांचा आवाज ऐकायला आला. मी कान टवकारून ऐकू लागले. दोघेतिघे असावेत. पण एवढ्या मिट्ट काळोखात हे आले कुठून? आपल्याला भास तर होत नाही? गुहेत आमच्या श्वासांचेही आवाज घुमत होते त्यामुळे ते आवाज बाजूला सारून अगदी कान देऊन ऐकू लागले. खरंच माणसांचे आवाज होते. हळूहळू जवाळ येत येत आता ते खालच्या, हाकेच्या अंतरावरल्या हरीश्चंद्रेश्वराच्या देवळातून येत होते. मला एकदम बरं वाटलं. चला, कोणीतरी आहे सोबतीला. पण पुन्हा वाटलं, खाली देवळात आहेत तेच बरं. त्यांनी गुहेकडे नको यायला. कोण जाणे कशी आहेत, किती आहेत, कोण आहेत. मगाशी वाघाची भीती वाटत होती. आता माणसांचीच वाटू लागली. पण त्यांच्यामुळे गडावर जाग आली होती. त्यामुळे बरंही वाटत होतं. आता त्यांनी शिवाजीमहाराजांच्या कायकाय घोषणा द्यायला सुरुवात केली. मधेच फटाकेही वाजवले. एरवी अशा शांत वातावरणात असल्या आवाजाने माझी चिडचिडच झाली असती पण तेव्हा मला ते घोषणांचे, फटाक्यांचे आवाजही हवेसे वाटले! मला आपली लखलख चंदेरी तेजाची दुनिया आठवली. प्रकाशाचं जग, आवाजांचं जग, माणसांचं, चेहर्‍यांचं, यंत्रांचं, वहानांचं..!
      त्याच जगाला कंटाळून आपण दिवाळीत असे वनवासी होतो. मग तेव्हा हवीहवीशी वाटणारी शांतता, एकटेपणा, निसर्गाची संगत सगळं मिळालेलं असताना पुन्हा त्या जगासाठी हुरहूर?
मधेच त्या माणसांचं जोरजोरात हसणं ऐकू आलं. मग मी जगदीशला हलवून उठवलं. त्याला म्हणलं, ऐक, कोणीतरी माणसं आली आहेत गडावर. तोही ऐकू लागला. मी म्हणाले, बघूया का पुढे जाऊन कोण आहेत ते? तो म्हणाला, ’माणसं आहेत एवढं पुरेसं आहे. झोप तू!’ ’किती वाजले?’
मी सांगितलं, ’नऊ!’ आम्हाला दोघांनाही हसायला आलं. तो परत झोपून गेला. मी जागीच.
      मग मी झोप यावी म्हणून रामरक्षा म्हणू लागले. मधेत ती तार कुठेतरी तुटून गेली. आणि मी त्या माणसांचेच विचार करत बसले. मग पुन्हा झोप येण्यासाठी मी माझा आवडता खेळ चालू केला. मी मेंढरं मोजू लागले :) डोळ्यासमोर मेंढरं आणली. ती इकडेतिकडे पळत होती. मी त्यांना एक एक करत मोजत होते.
...मगाशी लावलेली मेणबत्ती विझली वाटतं. पुन्हा लावायला हवी...
...इकडे ती मेंढरं रानोमाळ होऊन गेली.पण पुन्हा मी त्यांना गोळा केलं. पुन्हा मोजायला सुरुवात. मोजता मोजता एक छोटी डुलकी लागली. पुन्हा मेणबत्ती विझली की काय अशा धसक्याने जाग आली. एकच पणती मिणमिणत होती. चटकन उठून नवीन पणत्या लावल्या. जेवण करून चारपाच तास उलटले होते, आता भुकेची जाणीव झाली. अंधारात खुडबुडत शोधलं, बिस्किटं हाताला लागली. एकेक खात बसले.
      आता देवळातून घंटानाद ऐकू येऊ लागला. आणि आरत्याही. म्हणजे ही मंडळीही शिवरात्रीची पूजा करायला आलेली आहेत तर. असूदेत. पूजेसाठी आली आहेत, भली असतील बिचारी.
.....पण तरी एवढ्या मिट्ट काळोखात???
      मोबाईलमधे अकराचा गजर झाला. ..म्हणजे आता उजाडायला सातच तास उरले! हे चांगलं आहे. आता आपण असंच उजाडायला किती वेळ उरला ते मोजत बसुया. थोड्या थोड्या वेळानं घड्याळ पाहू लागले. सहा तास पंचेचाळीस मिनिटे.. सहा तास पस्तीस मिनिटे.. मग मी या तिघांच्या श्वासांची गंमत ऐकत बसले. तिघांचे श्वास वेगवेगळ्या लयीत आणि पट्टीत चाललेले. वेदूचा श्वास किंचित जलद आणि त्याच्या श्वासानंतर एक बारीकसा कुईं असा आवाज. विद्याधीशचा श्वास एकदम संथ लयीतला. जगदीशच्या श्वासाच्या आवाजाची वरची पट्टी आणि उच्छवासात थोडा घोरल्यासारखा आवाज.. सगळे आवाज घुमत होते. मुलं बिनघोर झोपली होती. त्यांनी स्वतःला आमच्यावर सोपवलं आहे. जगदीशही गाढ झोपलाय. त्यानं स्वतःला कोणावर सोपवलंय? कसल्या विश्वासावर तो इतका बिनघोर झोपू शकतो? तो विश्वास मलाच का वाटत नाही? 
      मधेच त्या लांबच्या वस्तीवरचे लुकलुकणारे दिवे फक्कन विझले. वीज गेली वाटतं तिथली. लवकर परत येऊदे.
      एकचा गजर झाला. बाहेर त्या माणसांची पूजा उरकली असावी. आता त्यांनी पुन्हा थोडे फ़टाके वाजवले आणि परत शिवाजी महाराजांच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. कोण आहेत हे? आणि अशा अपरात्री हे सगळे प्रकार का करतायत? मी पुन्हा जगदीशला उठवलं. तो म्हणाला, अगं निर्मनुष्य ठिकाण आहे. जाग रहावी म्हणून करत असतील आरडाओरडा. ते आहेत सोबतीला. झोप बिनधास्त.
मी प्रयत्न करतच होते डोक्यातली चक्रं थांबवण्याचा. पण नव्हतं जमत मला.
      हळूहळू खालचे आवाज शांत होत गेले. मंडळी देवळातच झोपलेली असणार. आता मलाही जरा हलकं वाटू लागलं. डोळ्यावर झोप दाटू लागली. कधीतरी विचारांची चक्रं थंडावली आणि मी झोपून गेले. तीनच्या गजराने जाग आली, तेव्हा गुहेतले सगळे दिवे विझले होते. अंधारगुडुप होता. पण आता मला त्याचं काहीच वाटलं नाही. ...आता तीनच तास राहिले या भावनेचाही परिणाम असेल. अंधार छान वाटत होता, पण उजेड हवाच होता. पुन्हा उठून पणत्यांचं नवीन पाकीट फ़ोडलं आणि चारपाच पणत्या लावल्या. पुन्हा सगळे बारीक बारीक आवाज टिपत बसले. समोरच्या वस्तीतले दिवे पुन्हा लुकलुकू लागले होते. चला बरं झालं.
      नंतर असाच कधीतरी पाचचा गजर झाला. मग मात्र आम्ही दोघेही उठलो. त्याच मिणमिण उजेडात बांधाबांध करायला सुरुवात केली. पहाटेच्या अंधाराची भीती नाही वाटत.
      हळूहळू गुहेसमोरच्या झाडांच्या आकृती स्पष्ट होऊ लागल्या आणि मग फ़टफ़टलंच. कालची मंडळी कुठे झोपली होती कुणास ठाऊक. आम्ही पटापट आवरून देवळात गेलो. देवळात, कडेच्या ओवर्‍यांमधे , गुहांमधे, सगळीकडे बघितलं पण कोणीच नाही!
....म्हणजे? पूजा करून, जोरजोरात घोषणा देऊन, फ़टाके वाजवून ते रात्रीच परत गेले? एक वाजता??
काय विलक्षण माणसं!
......माणसंच होती ना??!!
काल बाहेर येऊन पहायला हवं होतं. मला चुटपुट लागून राहिली!
गडमाथ्यावरचे ढग, धुकं, कालची कोकणकड्याची, इंद्रधनुष्याची दृश्यं, आणि कालची क्षण क्षण अनुभवत काढलेली रात्र.. सगळं मनात, डोळ्यात साठवत आम्ही गड उतरू लागलो.
यथावकाश फटाक्यांच्या, रोषणाईच्या, माणसांच्या, यंत्रांच्या, वहानांच्या, माणसांच्या, इमारतींच्या, धुराच्या, लखलख चंदेरी जगात परत आलो.
गाडीतून उतरलो, तर बिल्डिंगसमोर हजार फ़टाक्यांची माळ लावलेली. आमचं बोलणंही एकमेकांना ऐकू येईना. वेदात्मन त्या आवाजाला घाबरून मला घट्ट बिलगून जोरजोरात रडू लागला. रडतारडताच म्हणाला, "आई, कशाला आलो आपण इथे. काल किती छान होतं गडावर....."

Thursday, July 22, 2010

होऊन होऊन काय होईल!

लग्नानंतरचे मंतरलेले दिवस! आम्ही काठमांडू-पोखरा-चितवन असा दौरा आखला होता.१२ जुलै १९९८ रोजी आम्ही पोखर्‍यात होतो. जिथे उतरलो होतो ते होतं ’लेक व्ह्यू रिसोर्ट’. पोखर्‍यातील ’फ़ेवा ताल’च्या जवळचं. तिथे पोचलो आणि हरखलोच. एकतर दिवस ते तसे - आकाश-पाणी-तारे-वारे सजीव असणारे - त्यात सरोवराकाठचा निवास-मधेच दर्शन देणारी शुभ्रधवल हिमशिखरे-आल्हाददायक हवा- वा वा वा! एकदम रोमॅंटिक सिच्युएशन! पुन्हा, लग्नाला आठच दिवस झालेले.त्यामुळे जगदीश जे काय म्हणेल त्याच्यावर मी विश्वासच ठेवायचे. त्याच्या कित्येक वाक्यांचे, शब्दांचे त्याला अभिप्रेत असणारे अर्थ आणि मला माहिती असणारे सर्वसामान्य अर्थ यातला फ़रक मला अजून कळायचा होता. त्याची अवघड-सोपे, लांब-जवळ, सोय-गैरसोय याची परिमाणेही मला समजलेली नव्हती. त्यामुळे ’अगं बरोबर आहे हा रस्ता’ असं तो म्हणाला की मी डोळे झाकून त्याच्याबरोबर जायचे. तो ’अगं जवळच आहे ते फ़लाणं ठिकाण’ असं म्हणाला की मीच म्हणायचे - मग जाऊ चालत चालत. तोही हे सगळं इतक्या ठामपणे सांगायचा (आणि अजूनही सांगतो) की मीच काय, माझ्याजागी दुसरी कोणीही असती तरी तिने विश्वासच ठेवला असता.
तिथे गेल्यावर आम्ही फ़ेवा लेककडे गेलो. तर तिथे बोटिंगचीही सोय होती. अरे वा! मी मागे वळून जगदीशशी काही बोलेपर्यंत तो बोटिंगची चौकशी करायला गेलाही. परत आल तो हर्षोत्फ़ुल्ल चेहेर्‍यानेच. कारण तिथे त्यांच्या नावाड्याशिवायही नाव घेऊन गेलेलं चालणार होतं. म्हणजे बाकी कोणी तसे जाताना दिसत नव्हते, पण यानं बहुदा त्यांच्याशी ’कृष्णामाई’च्या गप्पा मारल्या होत्या. त्यामुळं त्यांनीही त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. मीही त्याचं नौकानयन कौशल्य पाहिलं नसलं तरी घरची नाव पाहिली होती, त्याच्याकडून आणि बाकीच्यांच्याकडूनही बरंच काही ऐकलं होतं. तरीही मी आपलं एकदा विचारुन घेतलं - जमेल नं तुला? मला काही पोहता वगैरे येत नाही हं’ त्यावर त्याचं उत्तर, चल गं, होऊन होऊन काय होईल? आणि मी आहे ना!
मग मलाही वाटलं. आम्हा दोघांमधे तो नावाडी कशाला उगीचच (तेही घरचा नावाडी असताना).
मग गेलो आम्ही नौकाविहारासाठी.
तिथल्या होड्या सांगलीसारख्याच लांबूळक्या, पण जर लहान होत्या. आणि तिला इकडच्यासारखी दोन वल्ही नव्हती. एकच उलथन्यासारखे वल्हे, त्याला चप्पू म्हणायचे. ते एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे मारायचे. जगदीशने त्याची सगळी माहिती करुन घेतली. मीही बिनधास्त होते. होऊन होऊन काय होणार?!!
आमचा नौकाविहार चालू झाला. मी मस्त इकडे तिकडे बघत, गप्पा मारत, पाण्यात हात घालत मजेत बसले होते. होडीत आणखे एक ज्यादा वल्हं होतं. मी उगाचच चार वल्ही मारली. पण दोघांनी विरुद्ध दिशेला वल्ही मारल्यावर होडी गोल गोल फ़िरते आहे हे लक्षात आल्यावर ते ठेवून दिलं. किनारा लांब लांब गेला. बाकीही नावा लांबच होत्या. आ हा! विस्तीर्ण, निळा जलाशय, तशात मंद मंद वारा सुटलेला.....आम्ही सगळ्या जगापासून लांब.. दोघेच दोघे..सूख सूख म्हणतात ते हेच...नाविकाsss चल तेथे...

"अरे अरे! एवढ्यात कशाला परतायचं. जाऊ ना अजून पुढं. वेळही आहे अजून आपल्याकडे"
"मी कुठे परत फ़िरलोय - नाव आपोआपच फ़िरतेय.."
"!!!!"
"वार्‍यामुळे लाट उठलीये त्यामुळी हवी तिकडे नेता येत नाहीये"
"???"
"छ्या! सांगलीला दोन दोन वल्ही असतात. हे असलं एका उलथन्याचं काही जमत नाहीये. काही ताकदच लावता येत नाहीये."
आमची नाव पुढेही जात नव्हती आणि मागेही येत नव्हती. जगदीश जोरजोरात वल्हं मारत होता. आणि वल्हवता वल्हवता, ,तशातही मला नाव वल्हवण्याची थिअरी समजावून सांगत होता.
"एरवी ना आपण असं असं वल्हं मारुन पाणी मागे सारतो. हे असं वल्हं मारलं की नाव इकडे वळवता येते.असं मारलं की तिकडे.. पण अशी लाट उठली ना की काही उपयोग होत नाही. काय होतं की........................
मला पुढचं काहीही ऐकू येईना.
थोड्या वेळात तोही घामाघूम झाला. चेहेराही जरा वेगळा वाटू लागला - साहजिकच होतं - लग्नाला आठच दिवस झालेले, परक्या मुलुखात, भर सरोवरात नाव फ़सलेली, दूरवर कोणी नाही... मग मी त्याच्याकडे तोंड करून बसले होते, ती उठले आणि उलटी, त्याच्याकडे पाठ करून बसले. ते जास्तीचं वल्हं घेऊन, त्याच्या वल्हवण्याच्या वेगाशी synchronise करून मीही त्याच्या बरोबरीने वल्हं मारू लागले.
डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे...
काहीही उपयोग नाही. नाव आपली होती तिथेच.
होऊन होऊन काय होणार..... देवा रे! काय होणार....???
दोघे वल्ही मारून मारून अक्षरशः बेजार झालो. पण नावेचं डळमळणं आणि तिथल्या तिथेच घुटमळणं काही थांबेना. माझं डोकं बधीर झालं. इकडे तिकडे पाहिलं तर दूरवर एक नाव दिसली. सुचेल त्या प्रकारे त्या नावेतल्यांना हाका मारायला सुरुवात केली. जगदीशही हाका मारू लागला. त्याही ऐकू जाईनात. मग मी कॅमेर्‍याच्या बॅगेतलं कॅमेरा पुसायचं कापड काढून हलवायला लागले आणि जगदीश तोंडात बोट घालून जोरजोरात शिट्ट्या मारू लागला.
शेवटी त्या नावेतल्या माणसांना समजलं की काहीतरी गडबड आहे. ते झपाझप वल्ही मारत आमच्याकडे येऊ लागले.त्यालाही जवळजवळ दहा मिनिटे लागली. तोपर्यंत आम्ही तर थकून गेलो होतो पण कोणीतरी मदतीला येतंय हा दिलासा खूप होता. तो आमचा तारणहार जवळ आला. त्याच्या नावेत दोन नावाडी होते. त्या दुसर्‍याकडे वल्हं देऊन तो उडी मारून आमच्या नावेत आला. आम्ही आमचं वल्हं त्याच्याकडे सोपवलं आणि त्याने यथावकाश आमची जीवननैया किनार्‍याला लावली. आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. हात घट्ट धरून काठावरच्या एका ठिकाणी गेलो. बाहेर थंडी नसतानाही मला हुडहुडी भरली होती. (अंगारकी चतुर्थी असतानाही...)जगदीशने थंडी पळवणारी पेये मागवली. ती पिऊन आम्ही जरा हुश्शार झालो. अनोळखी ठिकाणच्या पाण्याशी मस्ती करायला जायचं नाही असं ठरवलं.
मग दुसर्‍या दिवशी पोखर्‍यातल्याच ’बेगनास ताल’ मधे आणखी एक जोडपं आणि नावाडी यांच्याबरोबर बोटिंगला गेलो!
नंतर सांगलीत आल्यावर जगदीश आणि मंडळींचं पुराच्या तांबड्यालाल पाण्यातलं नावा चालवणं पाहिलं. विद्याधीशच्या वेळी त्याच्या नावेतून नदीत चक्कर मारली, विद्याधीश लहान असताना तिथल्या प्रथेप्रमाणे जगदीशच्याच नावेतून जाऊन कृष्णाबाईची ओटीही भरली.

पण पोखर्‍याचा हा अनुभव गाठीशी असल्याने जगदीशच्या कुठल्या बोलण्याचा कसा अर्थ घ्यायचा असतो आणि त्याने सांगितलेल्या कोणत्या गोष्टीवर डोळे झाकून कधी आणि डोळे उघडे ठेऊन कधी विश्वास ठेवायचा असतो हे मात्र पुरेपूर शिकले.

चांदणवेळा

आजोळी नाना प्रकारची फ़ुलझाडं होती. त्यातच, अंगणाकडेला मोग‍र्याचा वाफा होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे जायचो तेव्हा मोगरा बहरलेला असायचा. देवांना मोगर्‍याचे हार, पिण्याच्या पाण्यात मोगरा, आमच्या केसात मोगरा असे ते मोगर्‍याचे दिवस असत. आम्ही सगळे ओटीवर झोपत असू. समोरच्या अंगणात मोगरा असे. झोपायच्या वेळी त्याच्यावरच्या कळ्या अर्धवट उमलू लगलेल्या असत. एकदा मोगर्‍यापाशी जाऊन, त्याला हात न लावता, जागं न करता लांबूनच त्याचा वास घ्यायचा आणि मग झोपायचं अशी माझी नेहमीची सवय. 
एकदा, कशाने कुणास ठाऊक.. मला अपरात्रीच अगदी लख्ख जाग आली. बाहेर पाहिलं तर टिपूर चांदणं होतं आणि लक्ष गेलं, तर मोगर्‍याच्या कळ्या टप्पोर उमललेल्या! उठले, मोगर्‍याजवळ गेले...
शुभ्र फ़ुलं... शुभ्र चांदणं... उन्हाळ्यातल्या रात्रीचा सुखद गारवा... आणि चांदण्यात न्हाणार्‍या मोगर्‍याचा परिमळ..! 
...मोगर्‍याचा, की चांदण्याचा? .... चांदणगंध? दरवळणारं चांदणं?
 कितीतरी वेळ तिथे बसून राहिले. डोळे मिटून तो गंध भरभरून घ्यावा, तर ती चांदणफ़ुलं क्षणभरही नजरेआड करवेनात!
 आजुबाजूचं पानही हलत नव्हतं..सगळं झोपलं होतं. फ़क्त मी जागी होते आणि माझ्याबरोबर तो अवचिता परिमळु! 
कशानं जाग आली होती मला? मोगर्‍यानं मला गंधाचं आवातणं पाठवलं? 
खूप वेळ बसले तशीच- तो गंधसोहळा अनुभवत. मग वाटलं, आता कोणी उठलं, तर उगीच सतरा प्रश्नांना उत्तरं देत बसावं लागेल. नकोच ते. उठले आणि हळूच अंथरुणात शिरले. ती आठवण त्यादिवशीच्या चांदण्याइतकीच लख्ख आहे. 
-------- 

हुरड्याच्या दिवसात आमच्या गावाला गेले होते. पहाटे पहाटे बाबा शेतात एक चक्कर मारायला जात. त्यादिवशी मलाही त्यांच्या बरोबर जाग आली. ते म्हणाले, चल येतेस का माझ्याबरोबर. मी स्वेटर, चप्पल घालून, बॅटरी घेऊन तयार झाले. पहाटेचे पाच साडेपाच झाले असतील. काहीतरी बोलत बोलत आम्ही शेताच्या वाटेला लागलो. मग आम्ही आकाश बघायला लागलो. बाबा मला नक्षत्रांची कायकाय नावं सांगु लागले. चांदण्या बघत बघत चालणं जरा त्रासाचंच होतं. शेवटी शेतातला गोठा आणि बाबुकाकांची झोपडी हाकेच्या अंतरावर आली, तेव्हा बाबांना म्हणाले, जा तुम्ही . मी येते मागून. ”लवकर ये आणि बाबूच्या खोपटात थांब’ ते म्हणाले. आणि पुढे गेले. 
मग मी जरा आजुबाजुला बॅटरी मारली आणि बसलेच त्या धूळभरल्या वाटेवर चांदण्या बघत. तरीही नीट दिसेनात. मग सरळ एक दगड उशाला घेऊन आडवी झाले. आता बेष्ट दिसत होतं.
....चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे... !
एकीकडे आकाशगंगेचा पिठूर पट्टा- चांदण्यांच्या वाळूचा. सन्यस्त ध्रुव आणि लखलखता शुक्र. मधेच कुठे ढळणारा तारा. एकीकडे सप्तर्षी - तिकडे सप्तर्षींना मामाभाच्याचा नांगर म्हणत - पुढे दोन मामाचे बैल, मागे दोन भाच्याचे बैल, त्यांच्या मागे मामा, मग भाचा आणि कडेला टोपलीत भाकरी घेऊन आलेली मामाची पोरगी. 

पुण्यात फ़क्त डोक्यावरच्या आकाशाच्या तुकड्यातच चांदण्या दिसतात. तिथे त्या क्षितिजरेषेपर्यंत दिसत. अपलक नजरेनं ते आकाश डोळ्यात साठवून घेत राहिले. चांदणभरलं आकाश आणि चांदणभारली पहाट! "कुटं हायसा.." म्हणून भरड आवाजातली बाबुकाकांची हाक आली. मग धूळ झटकून उठले आणि त्याच्या खोपटासमोरच्या शेकोटीच्या उबेला जाऊन बसले. 
----- 

उन्हाळ्याच्या सुट्टीत दापोलीला मैत्रिणीच्या घरी जमलो होतो. एक दिवस हर्णैला समुद्राकाठी MTDC च्या तंबूत रहायचं आणि सकाळी उठून चालत चालत आसूदला जायचं असा बेत ठरवला. समुद्राकाठची तंबूची सोय मस्तच होती. रात्री उशीरापर्यंत पत्ते खेळून झोपायला गेलो. सगळे झोपले. समुद्राची गाज अखंड कानावर येत होती. चांदण्याची एक चुकार तिरीप तंबूत डोकावत होती. मैत्रिणीला हळूच हाक मारली. तीही जागीच होती. हलक्या पावलांनी दोघी बाहेर आलो. आणि तंबूजवळच्या वाळूत पाय पोटाशी घेऊन, हात बांधून, काही न बोलता बसून राहिलो. चांदणं.. समुद्राची गंभीर गाज.. त्याचं चकाकणारं पाणी.. फ़ेसाळणार्‍या लाटा.. लाट मागे गेल्यावर चमकणारी ओली वाळू.. जहाजांचे दिवे.. माडांच्या झावळ्या.. त्यातून झिरपणारं चांदणं.. सगळंच अदभुत! कितीवेळ अशा भारलेल्या अवस्थेत बसलो होतो कुणास ठाऊक. कुठे गेल्या दोघी म्हणून तिच्या बहिणीनं घाबरून हाक मारली तेव्हा भानावर आलो. हसून आत जाऊन झोपी गेलो.

Friday, March 26, 2010

बाभुळझाड















बाभळी
लवलव हिरवीगार पालवी - काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे - फांदी तर काळोखी काळी
झिरमिळ करती शेंगा नाजूक - वेलांटीची वळणे वळणे
या सार्‍यातुनि झिरमिर झरती - रंग नभाचे लोभसवाणे
कुसर कलाकृति अशी बाभळी - तिला न ठावी नागर रीती
दूर कुठेतरी बांधावरती - झुकून जराशी उभी एकटी
अंगावरती खेळवि राघू - लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनिया मन - रमते तेथे सांज सकाळी
येते परतुन नवेच होऊन - लेवुन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखुन अवघ्या - धुंद सुवासिक पिवळे उटणे॥
बाभळीची झाडं लहानपणापासुन परिचयाची. पण इंदिरा संतांची ही कविता माहिती झाली आणि त्या झाडाकडे बघण्याची दृष्टीच बदलली. लवलवणारी नाजुकशी काळपट हिरवी पानं, घमघमणारे पिवळ्या फ़ुलांचे लोलक, झिरमिळ्यांसारख्या वळणावळणाच्या शेंगा आणि त्यातुन झिरमिर झरणारे आभाळाचे रंग! पायाशी कायम बकरीची पोरे खेळवणारी ही लेकुरवाळी बाभळीबाई आणि ही कविता यांचं तेव्हापासुनचं घट्ट नातं. बाभुळ दिसली की कविता आठवणार आणि कविता आठवली की बांधावरची बाभुळ डोळ्यांपुढे येणार.


पण नुकतीच एक मेलमधे वसंत बापटांची ’बाभुळझाड’ ही कविता वाचनात आली.



अस्सल लाकूड भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ॥
देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसुन बोटे
बाभुळझाड उभेच आहे ॥
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ॥
जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांद्यावरती सुतारांचे
घरटे घेऊन उभेच आहे ॥


ही कविता वाचली आणि ती बांधावरची लेकुरवाळी बाभळीबाई डोळ्यांपुढे आली नाही. आठवले ते माझे पणजोबा. शंभरी ओलांडलेले, त्यांच्या शेवटच्या दिवसांतले. माझ्या आईच्या आईचे वडील. अंगात मळकट पांढरं धोतर, सदरा आणि डोक्याला तसाच सुरकुतलेला पांढरा फ़ेटा. सातार्‍याजवळच्या वर्ये गावाचे ते इनामदार. माझ्या आईच्या, आजीच्या आठवणीतलं त्यांचं घर फ़ार वेगळं होतं. इनामदारांचा वाडा. रोजचा पाच-पंचवीस जणांचा राबता. तिथे मोठं देवघर होतं. रोज सकाळी पूजेसाठी काढलेल्या परसातल्या गावठी गुलाबाच्या ताज्या टोपलीभर फ़ुलांनी ते घमघमायचं. ’ अठरा धान्ये हिरव्या रानी -भरल्या कणग्या भरल्या गोणी’ असं ते समाधानी घर होतं. कालवशात ते सगळं नष्ट होत गेलं. माझ्या आठवणीतलं ते घर म्हणजे ’भिंत खचली कलथून खांब गेला’ असंच. पडझड झालेलं, मोडकळीला आलेलं, उखीरवाकीर. पणजोबांनी ही सारी स्थित्यंतर पाहिली. सगळं पहात, वारा खात - गारा खात ते भक्कम गाठीचं बाभुळझाड उभंच राहिलं.
अगदी लहान असताना मी वर्य़ाला जायचे, तेव्हा ते मला हाताशी धरुन आंब्याच्या बागेत, मारुतीच्या देवळात जायचे. भेटणार्‍यांना म्हणायचे, तुमच्या नशिबी आहे का असं पणतीच्या हाताला धरुन देवळात येण्याचं भाग्य! एकदा आजोळी, शिरोळला आम्ही जमलो होतो. तेही त्यांच्या लेकीकडे आले होते. त्यांना नरसोबाच्या वाडीला जायचंहोतं म्हणुन टांगा ठरवला होता. सकाळी टांगा आल्यावर कोणीतरी- मामा वगैरे मंडळी त्यांच्याबरोबर जायला निघाली. पण ते मात्र लहान मुलासारखा हट्ट धरुन बसले- माझ्याबरोबर कोणीही यायचं नाही. आज फ़क्त मी आणि द्वारकू (माझी आजी, त्यांची लेक) जाणार वाडीला! सगळ्यांनी मान्य केलं. आणि सत्तरी गाठणारी द्वारकू नव्वदी ओलांडलेल्या वडिलांना हाताला धरुन टांग्यातुन वाडीला घेऊन गेली! अशी आतड्याच्या नात्यांची, आपुलकीच्या धाग्यांची घरटी त्यांच्या अंगाखांद्यावर शेवटपर्यंत होती.
एकशेपाच वर्षांचे होऊन ते गेले. त्यांनी लावलेल्या आंब्याच्या बागेत त्यांची शंभरी साजरी झाली. त्यानंतर ते खूप थकत गेले. पण तरीही शेवटपर्यंत हसते बोलते होते. त्या कवितेतल्या हळद विटलेल्या, लवलव मिटलेल्या, पण तरीही ताठ राहिलेल्या बाभुळझाडासारखेच.